शनिवार १० - १० - २०२०
एक निवांत दिवस. सकाळ उशिरा सुरू झाली. उठण्याचं प्रयोजन नसल्यानं. चहात आज साखर घेतली. सुट्टी विशेष.
कणादची बॉलिंग ऍक्शन आवडली. त्याचा एक विडिओ घ्यावा म्हणतो.
गीता प्रेसची पुस्तकं आली आज दुपारी. घरची कोविडं प्रथा मोडून एक पुस्तक वाचायला घेतलं. अर्थात संघर्ष आणि निर्जंतुक करूनच. पोस्टमन ऑटोनी आला होता. चांगलं वाटलं.
उपनिषदांचं भाषांतर आणि भाष्य आहे. संस्कृत आणि हिंदी. इशावस्य उपनिषद आहे पहिलं. प्रथम श्लोक अजून चिंतनात आहे.
ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।। १ ।।
आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. सर्वांचं उत्तर लगेच मिळत नाही. मग ते प्रश्न मनाच्या कोपऱ्यात पडून राहतात. मग असा कोणता श्लोक येतो ज्यात सर्व काही सापडेल असं वाटतं.
युद्धभूमीवर परमात्म्याला गीता काशी स्फुरली असेल. काय मनोभावं असतील. तो पांडवांचा सखा. अर्जुनाचा गुरू आणि मित्र. इतका लिप्त आणि निरलिप्त एकाच वेळी कसा. तो धर्मयुद्धाचा पुरस्कर्ता मग अर्जुनाच्या वागण्याने क्रुद्ध नाही, सैन्याच्या जमावात गीत स्फुरेल इतकी शांत मनोदशा. तो या स्थितीत येण्यासाठी कसं जीवन जगाला असेल. काय तपश्चर्या केली असेल. किती जन्म केली असेल.
आपल्या देशात असे आदर्श आहेत हे सौभाग्य आहे. कसं आयुष्य जगावं? त्याला पाया काय. त्यावर इमारत काशी उभी राहू शकेल. या सर्वाचा एकमेव मार्ग हा श्लोक दाखवतो.
Comments